बुधवार, २१ जुलै, २०१०

प्रतिक्रिया

आज ई सकाळ वाचत होते. प्रत्येक बातमी खाली प्रतिक्रिया देण्याची सोय आहे. लोकशाही आहे ना प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली पाहिजे. पण लोकं काय वाट्टेल ती प्रतिक्रिया देत असतात. कधी कधी वाचून खूप चीड येते. बातमी वाचता वाचता स्क्रोल करत खाली जावं तर प्रतिक्रिया दिसतातच आणि कितीही नाही ठरवलं तरी पहिली प्रतिक्रिया वाचली जातेच.
मुक्तपीठ मधे तर काही प्रतिक्रिया दिलेल्या असतात. लोकं स्वतःचे अनुभव लिहितात, त्यावर तू मुर्खच आहेस एवढं कळत नाही का असे काही वेडपटासारखे लिहितात. म्हणजे अनुभव काय आहे त्याचा काही संबंध नसतो.
माझा ब्लॉग लिहियला सुरूवात केली आहे. आता असेच लोकं माझ्या ब्लॉग वर ही काहीतरी प्रतिक्रिया देतील. बघुयात काय होते ते.

हॉलिवूड मधे बदल

२०१२ हा चित्रपट पाहिल्यावर आपण ब्लॉग लिहियला सुरुवात करावी असे मला वाटले. म्हणजे नुसतेच वाटले, पुढे ६-७ महिने गेले तरी मी काहिच केले नाही. पण गेल्या २-३ महिन्यांपासून मला मराठी ब्लॉग विश्व चे व्यसन लागलयं. दर तासाने मी काही नवी एन्ट्री आहे का ते बघत असते. मग नवीन एन्ट्री नाहिये हे बघुन वर्गीकरण या पानावर जाते. त्यातल्या सगळ्या एन्ट्रिज वाचून झाल्या.  मग परत स्वतः ब्लॉग लिहिण्याच्या विचाराने उचल खाल्ली. आणि सध्या ऑफिस मधे काम कमी असल्याचा (गैर)फायदा घ्यायचा ठरवला. एवढी प्रस्तावना लय झाली. आता हॉलिवूड कडे वळूया... वाचकांनी स्लमडॉग मिलेनियर, २०१२, Indepedance day, armageddon हे चित्रपट पाहिले असतील असं गृहित धरून हा ब्लॉग लिहिला आहे.

स्लमडॉग मिलेनियर हा चित्रपट बघितला तेव्हा फारसा आवडला नाही. विकसित देशांना गरीब भारत बघायला आवडतो असे वाटले. एक कथा म्हणुन कदाचित चांगला वाटला ही असता पण... ह्या सिनेमाच्या प्रमोशन साठी आयोजित केलेले काही टॉक शोज पाहिले आणि भ्रमनिरास झाला. या सिनेमा मुळे अनिवासी भारतीयांची प्रतिमा नक्किच थोडी काळवंडली गेली. म्हणजे स्वतःच्या देशात यांना खायला मिळत नाही आणि राहयला जागा मिळत नाही मात्र आमच्या देशात येऊन आमची रोटी पाणी हडपतात असे नक्कीच काही लोकांना वाटले असणार.

२०१२ मधला एक छोटा बदल सांगण्याआधी मला Indepedance day या 1996 मधे प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची आठवण करून द्यायची आहे. हा चित्रपट खूप गाजला, नक्कीच सर्वांनी पाहिला असेल. त्यात शेवटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फायटर विमान चालवून त्या स्पेस शिप वर मिसाईल्स सोडतात. पण मोहिम सुरू करण्याआधी सर्व सैनिकांना एक भाषण देतात. त्याचा सारांश येवढाच आहे.. की संपूर्ण जगावर संकट आलं आहे आणि अमेरिकन लोकांवर संपूर्ण जगाला वाचवण्याची जबाबदारी आहे इ इ... त्या आधी एक ब्रुस विलीस चा आर्मागेडॉन हा चित्रपट आला होता, त्यात ही अश्याच टाईपचं एक भाषण होतं.

२००१ मधल्या हल्ल्यांमुळे असेल किंवा अमेरिकेतल्या immigrants च्या वाढत्या संख्येमुळे असेल पण अमेरिकाला हळुहळू बाहेरच्या जगाची ओळख होते आहे. आणि याचे प्रत्यंतर हॉलिवुड मधे ही येत आहे.

२०१२ हा चित्रपट पाहिला आणि हॉलिवूड मधला बदल जाणवला. चित्रपटची सुरुवात होते भारतातून. भारतातील एक संशोधक आपल्या अमेरिकन मित्राला/ पूर्व सहकाऱ्या ला (आड्रियन) भूगर्भातील बदल दाखवतो. (हे दाखवताना सुद्धा दिग्दर्शकाला रस्त्य़ावरच्या गायी आणि चिखलात खेळणारी मुलं दाखवायचा मोह झाला आहेच. पण आता हेच वास्तव आहे तर चित्रपटाच सुद्धा तसच दिसणार.) मग पुढे बरचं काही होतं. आणि शेवटी जेव्हा सर्व जण त्या प्रचण्ड शिप पाशी पोचतात, तेव्हा आड्रियन ला कळते की आपल्या भारतीय संशोधक मित्राला आणायला कोणते ही विमान पाठवलेच नव्हते. तोवर राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू झालेला असतो, त्यामुळे व्हाईट हाऊस चिफ संपूर्ण मिशन चा स्वयंघोषित मुख्य बनतो. त्या शिप मधे सर्व लोक बसण्या आधीच शिप सोडायला सांगतो. इतका वेळ शांत असलेला आड्रियन इथे सर्व जी-८ च्या राष्ट्राध्यक्षांना आवाहन करतो आणि सर्वांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो. थोडा वेळ थांबुन सर्व लोकांना घेऊन ती शिप मार्गस्थ होते.

अमेरिकन चित्रपटाचा असा शेवट हा अनपेक्षित होता. सर्व जगाचे तारणहार ते सर्व संमती ने निर्णय हा खूप मोठा बदल आहे. चित्रपटात झालेला हा बदल प्रत्यक्षात यावा एवढिच इच्छा.

मंगळवार, २२ जून, २०१०

ब्लॉग ची सुरुवात

हा ब्लॉग आयडी बनवून जवळपास दोन वर्षे झाली. काय लिहावे ते आधी सुचतच नव्हते. मग विसरुन ही गेले की मी ब्लॉग लिहिणार होते. ३-४ महिन्यापूर्वी इंटरनेट सर्फ करता करता marathiblogs.net  ही साईट बघितली आणि छंदच जडला. दर २-३ तासांने कोणती नवीन एंट्री आहे ते बघायचे. मग परत स्वतः चा ब्लॉग सुरू करण्याची परत तयारी केली. मग आपण कशावर ब्लॉग लिहियचा हा विचार करण्यात अनेक दिवस गेले. कोणी कविता करतात, कोणी पाककृती देतात, कुणी खादाडिवर लिहितात. मग विचार केला एका कुठल्या ठराविक विषयावर लिहायला पाहिजे असे नाही. विचार करत बसण्यापेक्षा ते लिहिणे जास्ती महत्वाचे. तेव्हा जे काही मनात येईल ते लिहायचे, बस आपले विचार छापत राहयचे...